‘आरोहन’साठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. ‘आरोहन’ (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.
आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.
मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).
शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.
परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्या बाजूला – मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.
सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले.
“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?”
“मग तू काय उत्तर दिलंस?”
“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”
“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?”
“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”
आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”
ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.
मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.
“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.
“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”
“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?”
“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.
“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”
“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.
“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”
आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणिवेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.
आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.
विवेक पटवर्धन