Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Meeting-Jambhlvadi-750

जीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा

‘आरोहन’साठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. ‘आरोहन’ (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.

आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.

मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).

शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.

परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला – मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.

सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले.

“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?”

“मग तू काय उत्तर दिलंस?”

“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”

“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?”

“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”

आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”

ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.

मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.

“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.

“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”

“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?”

“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.

“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”

“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.

“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”

आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.

आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.

विवेक पटवर्धन

Patient-Ambulance750

Life And Death At Shedyacha Pada

Working with Aroehan has been an eye opener for me. Actually, it delivers shocks when I witness the activities.

Aroehan is an NGO. In 2005-06, 169 children below the age of six died in Mokhada due to malnutrition. That led to formation of AROEHAN. It is striving to bring sustainable changes to the tribal communities. I got associated with Aroehan over the last two years.

With Madhuri, Ganesh (who work for Aroehan) and Sulabha, my wife, I went to Kurlod. It is a village consisting of many ‘pada’ or hamlets. Our vehicle took us to Pethecha Pada. Madhuri said that we had to walk to Shedyacha Pada where she had arranged meetings with the villagers. (More about our discussion with the villagers in another blog).

Shedyacha Pada is about two Kms away from Pethecha Pada, but you must cross a river. Pinjal River.

Pinjal-River

Presently the river does not have much water so one can cross it easily, jumping over the rocks. Then you climb up a tiny hill to Jambhul Vadi. Shedyacha Pada is a little further away. In the monsoon, both these hamlets get cut off completely from Pethecha Pada, putting the villagers’ life at risk in many ways.

We finished our meetings with people at Shedyacha Pada. Sarita and Meenakshi from Aroehan had arranged all meetings. We were walking back to cross the river when two persons approached us at Jambhul Vadi. They had some discussion with Madhuri and Sarita. They looked worried.

Madhuri and Sarita in discussion with Patient's relatives Madhuri and Sarita in discussion with Patient’s relatives

 

“A person is very sick. He must be taken to Hospital immediately. They were asking if he can be taken in our vehicle.”

“What did you say?”

“Yes, I said. If somebody is critically ill, there is no choice.”

“How will they cross the river? Can the patient walk?”

“They will carry him in a hammock. They do it – I mean they have to do it often. Sad. There is no way out!”

We crossed the river. And walked a few steps when Madhuri looked back and said “Look, they are already on the way.”

I turned back. They were crossing the river. It had taken me good time to cross it, balancing my way on the rocks. They crossed it as if it was as smooth as a runway! They walked incredibly fast with a fifty-kilo patient cuddled in their hammock! And barefoot!!

Carrying Patient in a Hammock across Pinjal River Carrying Patient in a Hammock across Pinjal River

I reached for my mobile and shot the video.

“Where will they go?” I asked Madhuri.

“There is a hospital about twenty Kms away. Our vehicle will take him there and then it will return to pick us up.”

“What happens when the river is in spate during the monsoon?”

“HE decides if the patient must survive or die. No help is available.” She pointed finger to the sky.

“A PHC (Primary Health Centre) unit is sanctioned for us. Since 2014. But it has not come up.” A villager said.

“It will come up soon. We must not lose hope,” another said.

“Till then this river will decide the life and death issues” the villager said.

I was feeling relieved that our vehicle was available for the patient. That it was available was just a coincidence.

We walked our way to the Pada. No word uttered. Feeling helpless. And powerless.

MataBaithak-1

आरोहन आणि आदिवासींच्या जटील समस्या

आरोहनच्या कामाची माहिती करून घेणे ओघानेच आले, कारण आरोहनने विश्वस्त म्हणून त्यांच्या समितीत मला सामावून घेतले. जव्हार-मोखाडा हे आरोहनचे कार्यक्षेत्र. जव्हारला जायचं म्हणजे मनोरपुढे उजवीकडे निघणारा विक्रमगडचा रस्ता धरायचा. तिथून पुढे जव्हार. अंतर तसं फार नाहीये, पण रस्ता इतका खड्डेवाला की आपला उत्साह निम्माशिम्मा व्हावा. किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय त्याची जाणीव करून देणारा. कारण खड्ड्यांनी बसणारे धक्के सौम्य म्हणावेत असे धक्के खेड्यातील परिस्थिती पाहता बसतात.

जव्हारला आरोहनचे कार्यालय आहे तिथलं काम उरकून धारेच्या पाड्याकडे निघालो. तुम्ही जर ‘धारेचा पाडा’ असा गुगलवर शोध घेतलात तर तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. धारेचा पाडा साखरी ग्राम पंचायतीत मोडतो. इथली वस्ती तर आदिवासींचीच आणि ती ही अगदी थोडी. कोणी तरी म्हणाले की हजारहून अधिक नाहीये. मला तर वाटलं की तेव्हढीही नसावी.

“तिची स्कूटर दिसत्ये म्हणजे रेश्मा पोचली आहे; इथेच ‘माता-बैठक’ आहे.” माधुरी म्हणाली. गाडी थांबली. समोरच एक छोटं आणि बैठं घर होतं, आत गेल्यावर ध्यानात आलं की ते एक छोटं सभागृह होतं. म्हणजे एक खोलीच. केवळ ह्याच कारणासाठी बांधलेली! साधारण १८ बाय १८ ची. आत ‘माता-बैठक’ चालली होती. रेश्मा वीस-पंचवीस आदिवासी महिलांना माहिती देत होती. काही महिला त्यांची मुले घेऊन आल्या होत्या. मी, माधुरी व डॉ. शुभा त्यांच्यात सामील झालो. माधुरी विविध प्रोजेक्टवर देखरेख करते तर डॉ शुभा म्हणजे आरोहनच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.

मोखाड्यात १६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाल्याची बातमी २००६ साली आली तेव्हा अंजली कानिटकर व डॉ हेलन जोसेफ यांनी त्वरित ‘आरोहन’ची स्थापना केली ती जव्हार मोखाड्यात आदिवासींच्या पाड्यात जाऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करायच्या उद्देशाने. (अनेक प्रश्नांचे पदर एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केवळ ‘स्वास्थ्य’ किंवा ‘आरोग्य’ अश्या एकाच प्रश्नावर काम करून भागणार नव्हते, तर सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार होते, त्यामुळे कामाची दिशा नंतर बदलण्यात आली.)

“हे माता-बाल सुरक्षा कार्ड. नोंदणी झाल्यावर लगेच मिळते. ही तर गरोदरपणाची कुंडलीच आहे!” रेश्मा माता-बैठकीतल्या स्त्रियांना सांगत होती. “नोंदणीपासून डिलिवरी व लसीकरणापर्यंत सर्व माहिती त्यात असते.”

“हे तीन रंग बघा, हिरवा, पिवळा आणि लाल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं बाळ ह्यापैकी कुठल्या रंगात असलं पाहिजे?”

“हिरव्या”

“फार छान. आपलं बाळ हिरव्या रंगात येण्यासाठी काय करावं लागेल?” रेश्माने रोख आता आहाराकडे वळवला. सुदृढ बालकाला आहार ‘तिरंगा’ – लाल रंगाचे टोमाटो, गाजर, पांढऱ्या रंगाचे दुध, भात, अंडी व हिरव्या भाज्या – असा तिरंगा आहार कसा द्यावा ते रेश्मा सांगू लागली. “तिरंगा आहार घ्यायला तुम्हाला लांब जायची जरूर नाही, हे सर्व घटक तुमच्या आजूबाजूला आहेतच.”

“इथे अजूनही अनेक बालकं अंडर-वेट असतात.” शुभा मला म्हणाली. “प्रश्न केवळ आहाराचाच नाही तर चुकीच्या समजुतींचा देखील आहे. आदिवासी समाजात अनेकदा गरोदर स्त्रिया पेज पिऊन राहतात. मग त्या ‘अॅनिमिक’ होतात. कसे आरोग्य राहिल त्यांचे; कशी वाढ होईल बाळाची?”

तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर टाटा सामाजिक संशोधन संस्थेतील दोघांचा एक अभ्यासपूर्ण लेख सापडेल. ‘२००५ मध्ये केवळ पालघर जिल्ह्यातच ७१८ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. २०१६ मध्ये ६०० पेक्षा अधिक मुले दगावली.’ त्या दोघा संशोधकांनी ३७५ मुलांचा अभ्यास केला. त्यात ५९% मुलांची वाढ खुंटली असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले.

“इथे मुलींचे शिक्षण फार होत नाही. सातवीनंतर अनेकदा शिक्षण थांबतेच. मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाली की तिचे लग्न होते. मग ती गरोदर राहते. हे सर्व मोठेच प्रश्न आहेत.”

“काल-परवांच पेपरात वाचलं की चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आश्रम शाळेत गरोदर राहिली.”

“आश्रम-शाळेत मुले मुली एकत्र शिकतात, आणि तिथेच राहतात. तिथे मुलीने गरोदर होणे हे काही आश्चर्यकारक नाही. अनेकदा अश्या मुलींची लगेच लग्ने लावून दिली जातात. त्यांच्या समाजात तो फार मोठा विधी नसतो. मुलगी एक दिवशी मुलाच्या घरी जाते, बस्स!”

“इथे माता-बैठकीत ती मुलगी बघा. तिच्या हातात बाळ आहे. ती आई तर सोळा वर्षांची असेल-नसेल.”

“त्यांचंही कुपोषण होतं. अनेकदा अश्या मुली आपलं वय अठरा सांगतात. तरीही असं वाटतं की त्या लहान आहेत. लहान वयात माता होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक देखील.”

रेश्मा महिलांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागली. चतुराईने तिने चर्चा ग्रामसभेकडे वळवली आणि ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. पण मोठ्ठा अडसर तर महिलांनी आपल्या प्रश्नाबाबत बोलू लागण्याचा होता. रेश्मा महिलांचं मन वळविण्यात कांही प्रमाणात तरी यशस्वी ठरली, त्या बोलू लागल्या पाण्याच्या प्रश्नावर! “असे प्रश्न सोडवायलाच ग्रामसभा व पुढे ग्राम-पंचायत असते.”

महिलांनी सभेत बोलणे हा एक त्यांच्या मनातला मोठ्ठा अडसर आहे. तो पार करणे सोपे नक्कीच नाही.

आता रेश्माने चर्चेचा रोख स्थलांतराच्या समस्येकडे वळवला. आदिवासींच्या पाड्यात स्थलांतर ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. केवळ शेतीवर जगता येत नाही, मग एक पीक काढले की शहराच्या दिशेने कूच!

“स्थलांतर अनेक रीतीने आयुष्य कुरतडते. कित्येक जण आपल्या वृद्ध माता-पित्यांना मागे सोडून जातात. मुलांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते, आणि आरोग्याची आबाळ होते. संपूर्ण खेड्याच्या ‘इकोनोमी’वरच अपरिमित दुष्परिणाम होतोय.”

“आरोहनने शेतकऱ्यांना दुसरे पीक कसे घेण्यासाठी मार्ग दाखवले आहेत, मदत केली आहे. आज कित्येक शेतकरी तसे दुसरे पीक काढत आहेत.”

“काही विशिष्ट भागातील स्थलांतर पन्नास टक्के कमी करण्याचा मनसुबा आरोहनने ठेवला आहे, आणि ते देखील एक आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट वाटतंय, यावरूनच कल्पना करा.”

मला आठवलं, रोटरीतर्फे आम्ही भिवंडीजवळ एक बंधारा बांधत होतो. मी बांधकाम चालू असताना तिथे गेलो तेव्हा तीन फुटाच्या काठ्या उभ्या करून कित्येक मजुरांनी संसार मांडला होता. “ते शेतीची कामं संपली की इथे कामासाठी येतात. होळीला परत आपल्या गांवी जातात,” बांधकाम कंत्राटदार मला सांगत होता. परतीच्या वाटेवर मी एका झाडाखाली स्थलांतरित कुटुंबाने थाटलेला संसार बघितला.

मी चालत्या गाडीतूनच फोटो काढला. माझ्यासारख्या शहरी वास्तव्य करणाऱ्यांना स्थलांतराचा प्रश्न किती मोठ्ठा आहे हे समजायला प्रत्यक्ष भिवंडी, मोखाडा अश्या भागात फिरायला हवे, आकडेवारी प्रश्नांची माहिती देते, पण त्याबाबत जाणीवा वाढवत नाही.

अत्यंत अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची परिस्थिती मी पहिली, आणि ती आपल्या समोर ठेवली आहे. कितीही काम केलं तरीही अपुरेच पडणार आहे. तरीही एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीच लागतील. ते अपरिहार्यच आहे.

सरकार ही जगातली सर्वात अकार्यक्षम संस्था आहे यात वादच नाही. मग ते कोणत्याही पार्टीचे असो. अनेक कार्यक्रम पेपरवर आहेत, पण लाभार्थी त्यापासून वंचित आहेत हेच कटू सत्य आहे. आरोहनसारख्या संस्था कार्यरत आहेत हा दिलासा असला तरीही मुंबईपासून केवळ दीडशे किमीवर इतकी भयाण परिस्थिती असावी हा नेत्यांनी, व्यक्तींनी आणि समाजानेही कूपमंडूक वृत्ती ठेवल्याचा आणि आत्मकेंद्रित असल्याचा परिणाम आहे यात शंकाच नाही.

विवेक पटवर्धन