भारत हा तरुणांचा देश आहे कारण भारतात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. सध्या भारत देश विकसाच्या मार्गावर आहे पण तरीही ग्रामीण भाग मात्र अजूनही मागेच राहिलेला दिसून येतो. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, दळणवळणाचा अभाव, गरिबी त्यात कामासाठी स्थलांतर या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागातील तरुण वर्ग चांगले शिक्षण किंवा चांगला जॉब याचा विचार न करता अर्ध्यावर शिक्षण सोडून एकतर मजुरीच्या कामावर जाणे किंवा फिल्मी गोष्टींचा प्रभाव पडून कमी वयात प्रेम करणे, पळून जाणे तसेच उनाडक्या करत फिरणे अशा गोष्टींच्या आहारी गेलेला आहे. याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर तर पडतोच पण देशाचा विचार करता देशाच्या विकासावर गंभीर परिणाम दिसून येतो.
डहाणू तालुक्यातील आगवन ग्रामपंचायत मधील शिशुपाडा येथे आरोहन माता व बाल आरोग्य आणि पोषण या विषयावर काम करत असतांना आरोहन कार्यकर्ती धनश्रीला जून महिन्यात १४ वर्षाची किशोरी गरोदर मिळाली. तिचा साथीदार सुद्धा १५ वर्षाचाच होता म्हणजे दोघेही अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांच लग्न देखील झालेलं नव्हते. मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलीला तब्बल ७ वा महिना लागलेला असूनपण तिची आरोग्य केंद्रात तसेच अंगणवाडीमध्ये गरोदरपणाची कुठेही नोंदणी झाली नव्हती याचे कारण पाहता त्या मुलामुलीवर पोलीस केस होऊ शकते म्हणून तिची कुठेही नोंदणी करून घेतली नव्हती. अशा काही घटना घडल्या असतील तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्याला काही शिक्षा होईल किंवा आपल्याला याचा पुढे जाऊन त्रास होईल या भीतीने त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा देण्यास नकारणे कायद्याने गुन्हा आहे, कारण आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला मिळालेला मुलभूत अधिकार आहे. म्हणून ती मुलगी कमी वयाची आणि अतिजोखमेची असल्यामुळे तिला आरोग्य सेवा मिळणे अत्यंत गरजेचे होते. असे असूनसुद्धा तिला कोणत्याही आरोग्य सुविधा न देता शिवाय तिची आरोग्य संस्थांमध्ये नोंदणी देखील करून घेतली नव्हती.
हे सर्व आरोहन कार्यकर्ती धनश्री हिला माहिती झाल्यावर तिने अशा वेळेस काय करता येईल याची माहिती घेण्यासाठी आरोहन प्रकल्प समन्वयक सुजाता यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी सांगितले कि, दोघांच्या आईवडिलांची जर पोलीस केस करायची इच्छा नसेल तर पोलीस केस होऊ शकत नाही म्हणून धनश्रीने याविषयी माहिती घेण्याकरिता दोघांच्या घरीदेखील भेट दिली त्यातून समजले कि दोघांचे आईवडील एकमेकांना स्वीकारण्यास तयार आहेत. पण तरीही आरोहनचे कार्यकर्ते अशा अल्पवयीन मुलामुलींवर काही तक्रार होऊ शकते का? जर झाली तर अशा मुलामुलींचे करियर धोक्यात जाते म्हणून पोलीस केस होऊ नये याविषयीची माहिती घेण्याकरिता डहाणू पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. आरोहनने घटना घडली आहे असे न सांगता जर अशी घटना घडली तर त्यावर तक्रार न करता वेगळा उपाय काय असू शकतो याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे घटना घडूच नये यासाठी काय करणे जरुरीचे आहे हे सांगण्यात आले म्हणून अपेक्षित माहिती न मिळाल्यामुळे तिथून माघारी यावे लागले पण आरोहन ला जेव्हा हि घटना माहिती झाली होती तेव्हाच
त्या मुलीची जवळच्या आरोग्य केंद्रात नोंदणी करवून घेतली होती त्यामुळे तिला गरोदर तपासणी व लोहयुक्त गोळ्या चालू करून दिल्या होत्या. यासाठी त्या मुलीला उपकेंद्र, उपकेंद्र ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ते उपजिल्हा रुग्णालय येथे फिरावे लागले सोबत तिच्या आरोहन कार्यकर्तेदेखील होते.
पुढे इतर हालचाल करायच्या अगोदरच ती कमी वयाची आणि जोखमेची माता असल्यामुळे तिची ७ व्या महिन्यातच प्रसूती झाली. किमान तिची आरोग्य केंद्रात नोंदणी झाली म्हणून तिची प्रसुतीदेखील उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे झाली, पण बाळाचे वजन कमी असल्यामुळे व आरोग्याच्या पुरेशा सुविधा शासकिय रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयातून दुसऱ्या राज्यात सेल्वास(दादरा आणि नगर हवेली) येथे पाठविण्यात आले,नाईलाजाने त्या मुलीला व तिच्या नातेवाईकांना तिकडे जाण्यास भाग पडले. परंतु त्या दोघा अल्पवयीन मुलामुलींवर कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार झाली नाही तसेच आई व बाळ दोन्ही सुखरूप आहेत. येथे आरोहन चा उद्देश हा नाही कि अशा अल्पवयीन मुलांना प्रोत्साहित करणे तर अशा घटना काही कारणात्सव घडल्या असतील तर त्या व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळवून देणे हा आहे कारण आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला मुलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे.