मोखाडा तालुक्यातील पोशेरा कातकरी वाडीतील 11 कातकरी मजुरांना पंढरपूर येथे ऊस तोडणीचे काम देतो असे सांगून उस्मानाबाद येथील सारंग नामक व्यक्तिने 50 हजार रुपयाचे आमिष दाखवून 4 कुटुंबातील 11 मजूर व 6 लहान बालकांना पिक अप गाडीत घालून कर्नाटक मधील तिसऱ्याच मालकाकडे विकले असल्याची माहिती आरोहनची कार्यकर्ती मंजुळाने मला काल दिली. मी तिच्याकडून मजुरांपैकी कोणाचा फोन नंबर मिळतो का याची माहिती घेतली. योगायोगाने एका मजुराचा नंबर मिळाला. त्याच्याकडून मी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याने सांगितले की, आम्हाला पंढरपूर येथे ऊसतोडणीचे काम देतो असे खोटे सांगून आम्हाला कर्नाटकच्या बेळगाव मधील एका अनोळखी मालकाच्या ताब्यात देण्यात आले. आमची फसवणूक झाली आहे. तो मालक आम्हाला पहाटे 3 वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जबरदस्तीने कामाला लावतो. जादा काम करण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देतो. तेथून आम्हाला तो सोडतही नाही. आम्हाला शिवीगाळ करतो, उस्मानाबादच्या मालकास फोन केल्यास तो तुम्हाला तेथेच काम करावे लागेल असे सांगून मालकाला भडकवतो व आम्हाला धमकवतो. आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. आम्हाला कोणताही आधार नसल्याने आम्ही सर्व दहशतीमध्ये असून खूप घाबरलो आहोत. तुमच्या फोनमुळे आम्हाला धीर आला आहे. त्याची ही हकीकत ऐकून मी त्याला आरोहन संस्थेच्या मार्फत लवकरच तुमची सुटका करण्याचा विश्वास दिला. त्याला खूप हायसे वाटले.
या प्रकरणाबाबत मी संस्थेचे सी.इ.ओ. अमित नारकर यांचे समवेत चर्चा केली, चर्चेतून ठरल्याप्रमाने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार यांना सविस्तर पत्र लिहून भालचंद्र साळवे सह भेटायला गेलो. परंतु त्या कार्यालयात नसल्याने भेट होऊ शकली नाही, मग फोनवरून सांभाषण केले. प्रकरणाचे गंभीर्य ओळखून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोखाडा तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले, त्याप्रमाणे कालपासून त्या मजुरांना सोडविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आज सकाळी महाराष्ट्र पोलीस मजुरांपर्यंत पोहचले. त्यांनी मजुरांची चौकशी करून त्यांना मूळ गावी येण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. आज रात्री किंवा उद्या सकाळी हे मजूर आपल्या गावी परतातील. या गंभीर प्रकरणाची दखल जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. आयुषी सिंह यांनी ज्या तात्परतेने व संवेदनशीलतेने घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानावे तेवढे थोडे आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे 11 कातकरी मजुरांना वेठीतून मुक्त करण्यास यशस्वी झाल्याचे समाधान वाटते.
मात्र मोखाडा – जव्हार तालुक्यातील असाहाय व नडलेल्या कातकरी समाजाचे शोषण केव्हा थांबणार? हा प्रश्न मन सुन्न करतो.
प्रदीप खैरकर,आरोहन.