विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षात अनेक प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनात करत आहे. विज्ञानाचा सर्वात मोठा अविष्कार म्हणजे वीज निर्मिती. माणसाने कोळशापासून पाण्यापासून, सूर्याच्या ऊर्जेपासून, वाऱ्यापासून विजेची निर्मिती करत आहे. परंतु जगातील काही भाग हा ह्या विजेचा अतिरिक्त वापर करतना दिसून येतो, तर काही लोकांनी वीज कशाला म्हणतात हे देखील पाहिले नाही.
भारतासारख्या प्रगतीशील देशात सुद्धा उच्च वर्गीय आणि शहरी भागात राहणारा माणूस आज विजेचा अतिरक्त वापर करत आहे, परंतु भारतातील ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती अजूनही विजेच्या प्रतिक्षेत आहे. काही गावात विजेच्या चोरीचे प्रकार सर्रास दिसून येतात, तर काही ठिकाणी विजेचे मीटर दिले आहेत पण जोडणी न करता बिल पाठवत आहे. अशीच एक गोष्ट आहे, चांदवड गावातील काठे पाड्याच्या मधल्या गावकऱ्यांची विजेची पंचाईत!!
डहाणू तालुक्यातील चांदवड गावातील सुमारे ४० घरे आणि २०० लोकसंख्या असलेलं काठेपाडा. गावचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोहन संस्थेने काठेपाडा मध्ये पाडा समिती स्थापन केली. पाडा समितीने आपण प्रत्येक महिन्यात आपली गावची सभा घेऊन गावातील समस्या एकत्रित येऊन सोडवल्या पाहिजे असे सर्वांचे मत झाले. तशीच एकदा एप्रिल (२०२३) महिन्यात पाडा समितीने गावाची सभा घेतली. त्या सभेत गावातील लोकांनी आपल्या गावातील विजेच्या प्रश्न बाबत चर्चा केली. चर्चा करताना असे समजले की, तालुक्याच्या महावितरण विभागाने १२ कुटुंबांसाठी हे विजेची जोडणी होणार होती ती जोडणी होण्यापूर्वीच ह्या कुटुंबाना विजेचे बिल येत होते. ह्या बिलांची रक्कम तर त्यांच्या आवाक्याबाहेर होती. ह्या कुटुंबात जास्त विजेची उपकरणे पण नाहीये तरी त्यांना साधारण ९०० ते ३००० रुपयेपर्यंत चे बिल आकारण्यात आले.तसेच विजेचे पोल हि गावात आणून ठेवले आणि जोडणी केली नव्हती. सभेत हा मुद्दा घेण्यात आला, आणि तो सोडवण्यासाठी पाडा समिती आणि सभेत जमलेल्या लोकांनी ग्रामपंचायत ला पत्र देण्याचे ठरवले. ग्रामपंचायत मधून सांगण्यात आले की, आम्ही आमच्या पातळीवर हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करू. एक महिना झाल्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून सर्व पाडा समिती सदस्य यांनी जवळच्या MSEB कार्यालयात भेट देण्याचे ठरवले. जून महिन्याच्या १८ तारखेला आशागड च्या MSEB कार्यालयातून विजेचे मीटर देण्यात आले आणि आकडेवारी पहायाला सांगितले. तरीही आकडेवारीनुसार विजेचे बिल हे जास्त येत होते. म्हणून जून महिन्यात (२७ तारखेला) पुन्हा एकदा ग्रामपंचायत ला अर्ज देण्यात आला. ग्रामपंचायतने या अर्जासोबत कार्यालयीन कॅव्हरिंग लेटर जोडून महावितरण च्या आशागड, डहाणू आणि पालघर कार्यालयात पत्र पाठवले तसेच त्याची एक प्रत स्थानिक आमदार यांना पण देण्यात आली. प्रत्येक आठवड्याला पाडा समिती चे सदस्य आणि गावकरी आशागड च्या MSEB च्या कार्यालयात भेटी द्यायचे पण प्रत्येक वेळी बिल रीतसर येईल असे तिथले अधिकारी सांगत होते.
पाऊस आणि शेतीच्या कामामुळे तिकडे थोडे दुर्लक्ष झाले, पण तरीही पाडा समितीने पाठपुरावा करणे चालूच ठेवले. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा तालुका पातळीवरील MSEBच्या कार्यालयात भेट दिली आणि तिथल्या उप कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणे झाले. बिलाच्या रकमेच्या काही प्रमाण कमी करून वीज बिल भरायाला सांगितले (उदा. एका कुटुंबाचे बिल हे २४३० इतके होते तर त्यांना १९१० रुपये इतके भरण्यास सांगितले). कुणाचीही वीज जोडणी न करता जास्त बिल आले कसे, यावर त्यांनी काही न बोलता, स्थानिक अभियंताला संपर्क करून लवकरात लवकर विजेची जोडणी करावी असे सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की तांत्रिक कारणांमुळे बिल जास्त येत होते, आता दुरुस्ती करून मीटर वर येणाऱ्या आकड्यानुसार वीज बिल येईल असे समजावून सांगितले. डिसेंबर महिन्यात आरोहन चे कार्यकर्ते यांनी पुन्हा एकदा काठेपाड्यात भेट दिली, आणि ज्या कुटुंबांचे बिल जास्त येत होते, त्यांचे ह्या महिन्यातील बिल तपासले असता, मीटरच्या आकड्यानुसार बिल येत आहे. तर अश्या प्रकारे, मीटर सुरु ही झाले आणि नियमित बिल हि यायला लागले.