
जव्हार -मोखाडा या दुर्गम तालुक्यातील दुर्बल व दुर्लक्षित आरोग्य व्यवस्थेच्या कारणामुळे दरवर्षी शेकड्याने आदिवासी माता-भगिनी-बालकांचा मृत्यू होत असतो. एखादा मृत्यू झाला की, चार आठ दिवस वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी, मंत्री-संत्री यांच्या गाड्यांचा धुरळा उडतो व त्यानंतर सारे शांत होऊन परिस्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखी जैसे थे होते. आदिवासी दुर्गम भागातील हे जे मृत्यू होतात त्याबद्दल त्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी इच्छाशक्ती ना अधिकारी दाखवत ना राज्यकर्ते ! ही खरी शोकांतिका आहे.
नुकताच २०२५ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोखाडा तालुक्यातील कोलद्याचा पाडा येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण गरोदर मातेचा उपचाराच्या हेळसांड व सोयी-सुविधा अभावी दुर्दैवी मृत्यू झाला. तिला जर जव्हार-मोखाडा येथील शासकीय रुगणालयात योग्य आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या असत्या तर तिला आपल्या नवजात शिशूला वाऱ्यावर सोडून या जगाचा निरोप घ्यावा लागला नसता. परंतु याचे दुख: ना आरोग्य यंत्रणेला आहे ना राज्यकर्त्यांना! आमच्या संवेदनाच इतक्या बोथट होऊन गेल्या आहेत की एखाद्या गरीबाचा मृत्यू म्हणजे चार घटकेचा ‘धुरळा इव्हेंट’ होऊन बसला आहे.
घटनाक्रम
२२ वर्षाच्या या अतिशय गरीब आदिवासी कुटुंबातील महिलेला बाळंतपणासाठी तिच्या नातेवाईकांनी दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दाखल केल्यानंतर तिच्याकडे नीट लक्ष दिले गेले नसल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांची आहे. दुसऱ्या दिवशी तिची प्रसूती नैसर्गिक व सुखरूप झाली. बाळाने गर्भात शी केल्याने गर्भ पिशवी साफ करताना रक्तस्राव सुरु झाला, रक्तस्राव थांबेना म्हणून तिला जव्हार येथील कुटीर रुग्णालयामध्ये संदर्भित करण्यात आले. तिथे तिला रक्त चढविण्यात आले. परंतु रक्तस्त्राव थांबत नसल्याने व रुग्णालयात व्हेन्टिलेटरची सोय उपलब्ध नसल्याने तिला नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले. खरे तर तिच्या आरोग्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती, त्यामुळे मोखाड्याच्या पुढे गेल्यावर रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु तशा परिस्थितीतही तिला नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही त्या मातेची परवड थांबेना, तिला वॉर्डमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध होईना, बऱ्याच वेळाने उपलब्ध झाले ते दुरवस्थेने जर्जर झालेले! कोणत्या वॉर्डात दाखल करायचे याची कोणी माहिती देईना त्यामुळे दोन वेळा दोन मजले चढउतार करून तिसऱ्या ठिकाणी जेमतेम दाखल केले आणि डॉक्टरांनी सांगितले पेशंट दगावला आहे, तिला घेऊन जा. दु:खात असलेल्या नातेवाईकांना कळेना आता काय करावे. हॉस्पिटलने शववाहिनीची अथवा गाडीची कोणतीही सोय उपलब्ध करून दिली नाही. शेवटी नातेवाईकांना खाजगी गाडी करून शव घेऊन यावे लागले.
यंत्रणेतील उणिवा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता
आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा व कर्मचाऱ्यांच्या कामतरतेमुळे अशा प्रकारच्या घटनांतून आजवर कितीतरी माता-बालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उपरोक्त घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता होती. येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडे मोखाडा व जव्हार अशा दोन तालुक्यांचा कार्यभार असल्याने त्यांनाही पूर्ण लक्ष देता येत नाही. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हे निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या सेवेबद्दल जनमानसामध्ये चांगली प्रतिमा आहे. सामजिक बांधिलकी जोपासून काम करणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. परंतु केवळ एखाद्या आरोग्य अधिकाऱ्याच्या चांगुलपणावर सेवांचा लेखा-जोखा मांडता येत नाही किंवा समस्या सोडवता येत नाहीत. त्या ठिकाणी साधनांची उपलब्धताच नसेल तर अधिकारी तरी काय करणार, असा प्रश्न उभा राहतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मोखाडा येथे आरोहन या सामाजिक संस्थेने गरोदर मातांची उपचाराची गरज लक्षात घेऊन सोनोग्राफी यंत्र पुरवले आहे. परंतु या ठिकाणी सोनोग्राफी तंत्रज्ञाची तरतूदच नसेल तर यंत्राचा उपयोग होत नाही. लोकांना गरज आहे, ती गरज भागवू शकेल अशी सुविधाही आहे, परंतु सेवा मिळत नाही. सोनोग्राफी तंत्रज्ञाअभावी या ठिकाणी आज आठवड्यातून एकच दिवस सोनोग्राफी केली जाते. तपासण्या न झाल्याने पुढे बाळंतपणाच्या वेळी अनेक गंभीर समस्या उद्भवून गरोदर मातांना प्रसंगी प्राणही गमवावे लागतात.
जव्हार-मोखाडा-विक्रमगड-वाडा या दुर्गम आदिवासी भागात आरोग्य केंद्रात नोंद झालेल्या एकूण गरोदर मातांपैकी ३० टक्के माता या अतिजोखमीच्या असतात, अशी आरोग्य यंत्रणेची आकडेवारी सांगते. हे प्रमाण खूप भयावह आहे. आणि त्यामुळे या भागातील आरोग्य साधन सुविधा, औषधसाठा, कर्मचाऱ्यांची संख्या या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आज शासनाची स्थिती ‘कळते पण वळत नाही’ अशी झाली आहे.
सामाजिक अडथळे व आरोग्य
एकीकडे आरोग्य यंत्रणेच्या उणिवा तर दुसरीकडे या समाजातील विविध सामाजिक रूढी-परंपरा व अंधश्रद्धा यांचा पगडा, अशा दुहेरी कात्रीत या भागातील महिलांचे आरोग्य अडकले आहे. याचे ताजे उदाहरण जव्हार तालुक्यात नुकतेच घडले. पवनमाळमधील एक ३० वर्षीय महिला मुलाच्या हव्यासापोटी अतिरिक्त बाळंतपणाची शिकार ठरली. ७ व्या बाळंतपणाच्या वेळी अंतर्गत इन्फेक्शन झाल्याने ८ जानेवारीला २०२५ रोजी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान तिला आपले प्राण गमवावे लागले.
गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेला आहार अंधश्रद्धांमुळे न घेणे, बालविवाह प्रथा, लग्नाशिवाय परस्पर संमतीने येणारे बाल मातृत्व, दवाखान्यात उपचार न करता भगताकडे उपचारासाठी जाणे, वैद्यकीय उपचारांची वाटणारी भीती, गरिबीमुळे अतिश्रमाला पर्याय नसणे (अनेक गरोदर महिलांना अगदी नवव्या महिन्यापर्यंत वजनी व अतिश्रमाची कामे करावी लागतात), मुलाच्या हव्यासापायी नवरा व कुटुंबाकडून लादली जाणारी अतिरेकी बाळंतपणे या सर्वांचे दुष्पपरिणाम शेवटी बाईलाच भोगावे लागतात. अनेक वेळा बाईला आपले प्राणही गमवावे लागतात. हे सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करावे लागतील.
काय करता येईल?
या भागातील भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रूढी-परंपरा, जीवनशैली हे सर्वच वेगळे आहे. त्यामुळे या भागातील आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी नेहमीच्या उपाययोजना कामी येतीलच असे नाही. त्यामुळे समस्यांच्या मुळाशी जाऊन त्याचा नीट अभ्यास करून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे असे प्रकर्षाने जाणवते. या भागातील स्वयंसेवी संस्था व शासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक दृढ करून नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. शासनाने निर्माण केलेल्या विविध स्थानिक समित्यांचे प्रभावी प्रशिक्षण करून त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनविकासासाठीही जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. या भागातील भगतांना विश्वासात घेवून त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दवाखान्यात पाठवावे यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर केवळ महिलांचीच जाणीव जागृती न करता या प्रक्रियेमध्ये कुटुंबातील पुरुषांना जाणीवपूर्वक सामील करून घेतले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांतून मुला-मुलींचे शरीर विज्ञान शिक्षण प्रभावीपणे होण्याची गरज आहे. रोजगाराचा प्रश्न, नागरी सुविधांची उपलब्धता याबाबतही गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.
एकंदर काय, तर एखादी समस्या सोडवायची असेल तर त्या एका समस्येचा विचार न करता चारी बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. याला दुसरा पर्याय नाही. कारण कोणतीही सामाजिक समस्या एकट्याने येत नसते तर तिला अनेक कंगोरे असतात हे कायम लक्षात ठेवून काम केले पाहिजे. हे जरा अवघड आहे, परंतु अशक्य नाही. शेवटी आपल्या संतांची उक्ती कायम लक्षात ठेवली पाहिजे. ‘ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे…’
-श्री. प्रदीप खैरकर ,
सामाजिक कार्यकर्ते- आरोहन