Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Tag: खैरमाळ

Aroehan 862×779

खैरमाळचा कायापालट

“गाडी थांबवा” माधुरीने शरदला म्हणजे ड्रायव्हरला फर्मावले. माधुरी, प्रतिभा आणि मी आरोहनच्या जव्हार कार्यालयातून खैरमाळला जायला निघालो होतो. शरदने गाडी शंभर-दोनशे फूटही चालवली नसेल तेव्हां माधुरीचा प्रश्न आला. “सर, तुम्ही टोपी आणली आहे ना?” “नाही, काही तशी जरूर नाही.” “ऊन फार कडक आहे, टोपी घेतलीच पाहिजे. गाडी थांबवा.” गाडी हमरस्त्यावरच्या एका जनरल स्टोअर समोर उभी राहिली. मी टोपी विकत घेतली. पुन्हा गाडीत बसलो, आणि खैरमाळला निघालो. माधुरी आणि प्रतिभा ‘आरोहन’ एनजीओमध्ये काम करतात. आरोहन हा शब्द म्हणजे इंग्रजी नावाचं संक्षिप्त स्वरूप आहे, म्हणून ते आरोहण नव्हे तर आरोहन. मला नुकतंच आरोहनने त्यांच्या विश्वस्त पदावर नेमलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची ओळख करून घेणं ओघानेच आलं. मी सर्वप्रथम खैरमाळचा प्रकल्प बघावा असे ठरलं. शरदने गाडी हमरस्त्यावरून डावीकडे वळवली. “खैरमाळ उंच डोंगरावर वसलंय. फक्त दहा घरांचं गाव आहे.” प्रतिभा म्हणाली. “किती दूर आहे?” “पंधरा किलोमीटरच आहे जव्हारपासून. पण रस्ता डोंगरातून जातो, आणि रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे वेळ लागतो.” थोड्याच वेळात आम्ही “काम चालू – रस्ता बंद” च्या जागी पोचलो. रस्त्याच्या एका भागाचं डांबरीकरण चालू होतं. त्यांच्या सुपरवायझरने गाडी थांबवली. “तुला आता सोडतो, पण परतताना दुसऱ्या वाटेने जा” म्हणाला. गाडी घाट उतरत होती. ऊन रणरणते होते. गुरंदेखिल झाडाखाली सावलीला उभी होती.   वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही एक दोन पाडे मागे टाकत गेलो. नदीवर एक पूल लागला. “हा पूल नुकताच बांधलाय. पावसाळ्यात ही नदी भरून वाहत असे तेव्हां खैरमाळचा जगाशी संपर्क तुटत असे.” माधुरी म्हणाली. “पूल बांधल्यामुळे मोठ्ठीच सोय झालीय.” आमची गाडी गीटीपाडा गांवात आली. विटांची घरं, प्लास्टर न केलेली, दुतर्फा होती. गाडीतून उतरलो व चालू लागलो. एक छोटी तीन फुटी भिंत दिसली, त्यावर तीन नळ होते. “हे आरोहननेच बांधले. बंधाऱ्यामुळे ह्या गांवापर्यंत नळ आणता आले.”   चार तरुण मुले जवळच होती. ती उठून उभी राहिली. मी नीट निरखून बघितलं. त्यांनी पिवळे हायलाईटकरून क्रिकेटरसारखे स्टाईलने कापले होते. अनेक आदिवासी घरांवर डिश आंटेना उभ्या होत्या. माधुरी आणि प्रतिभा झपझप चालू लागल्या. मी त्यांच्या मागे. माझ्या लक्षात आले की आम्ही एका टेकडीवर होतो, आणि आता दरीत उतरायचे होते. प्रतिभा पुढे गेली. वहिवाटीचा रस्ता सोडून पायवाटेने खाली गेली. माधुरी माझ्यापुढे पण माझ्यावर सतत लक्ष ठेवत, कधी उतारावर मला हात देत नीट पुढे नेत होती. ऊन खरंच भाजून काढत होतं, त्या दोघींनी डोक्यावरून पदर आणि ओढणी घेतली होती. त्यांनी मला टोपी का घ्यायला लावली ते समजलं. “आम्ही इथे बंधारा बांधलाय. खूप अडचणी आल्या, वेळ लागला, पण आम्ही काम पुरं केलं. वनखात्याच्या लोकांनीही आरोहनचं काम वाखाणलं.” प्रतिभा म्हणाली. मी सांभाळूनच टेकडी उतरत होतो. जसे खाली आलो तसा दूरवर बंधारा दिसू लागला. नदीच्या पात्रात मोठ्ठे दगड होते. त्यातून वाट काढत पुढे बंधाऱ्याकडे निघालो.   बंधारा आठ फूट उंच आहे आणि पाणी जायला व्हेंट आहे. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस गोल झाकणे दिसत होती. तीच व्हेंट. “पावसाळ्यात खूप पाणी येत. व्हेंट उघडली की बंधाऱ्यातला गाळ-कचरा बाहेर जातो. सप्टेंबरला व्हेंट बंद करतो, मग पाणी इथेच, बंधाऱ्यामागे, तलावासारखं थांबतं.” नदी ओलांडून आम्ही बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला गेलो. एक सुंदर डोह तयार झाला होता. बरंच खोल असावं. “पाणी फुटभर देखिल कमी झालं नाहीये.” माधुरी आनंदाने ओरडलीच. “एप्रिलचा महिना आहे. जूनपर्यंत पाणी टिकेल वाटतंय.” “हा बंधारा नव्हता तेव्हा खैरमाळच्या लोकांना पाणी आणायला दोन तीन किलोमीटर चालावं लागत होतं. तुम्ही नदीवरच पूल बघितला ना? तिथपर्यंत दोन घडे घेऊन बायका पाण्याला जात होत्या.” “सर, खैरमाळ ह्या डोंगरावर आहे.” प्रतिभाने मागच्या उंच टेकडीकडे बोट दाखवलं. म्हणजे आम्ही एक टेकडी उतरलो, नदीचं कोरडं पात्र पार केलं, आणि आता नदीच्या दुसऱ्याबाजूला असलेल्या उंच टेकडीवर खैरमाळला जायचं होतं. खैरमाळच्या बायका दोन घडे घेऊन खैरमाळची उंच टेकडी उतरून, मग दुसरी चढून पलीकडच्या नदीपर्यंत पाण्यासाठी जात असत, आणि परतत. हंड्यातलं किती पाणी सांडलं असेल आणि डोळ्यातलं किती सांडलं त्याची कल्पनाच केलेली बरी. आम्ही तिथेच बंधाऱ्यावर उभे राहिलो. तलावातल्या वनस्पतीकडे माझे लक्ष गेले. हिरवळीचे चेंडू एकत्र करावेत तशी दिसत होती. “त्या वनस्पतीला ‘गोंडूळ’ म्हणतात. त्याने पाणी गार राहातं.” माधुरीने माहिती पुरवली. मला वाटतं की गोन्ड्यासारखी वाढ दिसते म्हणून गोंडूळ नांव पडलं असेल. आम्ही खैरमाळची टेकडी चढायला लागलो. माधुरी आणि प्रतिभाने कमीत कमी त्रासाची वाट कोणती ते नक्की केलं. टेकडी उंच तर आहेच, पण रुळलेल्या पायवाटा दिसत नव्हत्या. “आम्ही प्रकल्पाच्या कामासाठी इथे अनेकदा आलो. इथे पावसाळ्यात खूप साप निघतात. फार भीती वाटायची. एक हातात काठी घेऊन पुढे आणि आम्ही सगळे तिच्या मागे रांगेने अशी वरात निघायची.” प्रतिभा म्हणाली. “आपण जाताना सोलार पॅनेल बघूया. आम्हीच बसवलेत ते. सोलारवर चालणारा पंप आम्ही बसवलाय. गावात पाच हजार लिटरची टाकी उंचावर उभारली आहे. पम्पामुळे खैरमाळला पाणी मिळते. आणि गीटीपाड्यालाही.” “नळाने पाणी आलं तेव्हां खैरमाळमधल्या मुलांना फारच आप्रूप वाटलं. त्यांनी नळातून पाणी येताना कधी बघितलंच नव्हतं. ती सारखी नळावर जात, नळ उघडून बघत.” माधुरी सांगू लागली. “पाणी नव्हतं म्हणून मुलांना आंघोळही कधीमधीच. मग आरोग्याचे प्रश्न उभे! इथे मुलांच्यात खरुज असण्याचे प्रमाण खूपच होतं. आता दररोज आंघोळ करतात. आम्ही खरुजेवर लावायला औषधे आणली. खरुज गेली सगळ्यांची. अर्धी-पाऊण टेकडी चढून गेलो होतो. आरोहनची सोलार पॅनेल दिसत होती. पंतप्रधान मोदींनी सर्व खेड्यांना वीज देण्याची घोषणा केली होती. खैरमाळ हे एक वीज [आणि इतर अनेक] सुविधा नसलेलं वंचित खेडं होतं. वीज तिथे महिन्या दोन महिन्यापूर्वीच आली. पण महाराष्ट्रात अनेक खेड्यांना चोवीस तास वीज मिळत नाही. इथे ‘कनेक्टीव्हीटी’चा कायमचा अभाव. इथे अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. पावसाळ्यात खैरमाळशी संबंध असा तुटत असे की जसं हे खेडं भारतात नाहीये. सोलार पॅनेलपासून गावापर्यंत चढ असला तरी वाट बरी आहे. आम्ही पुढे गेलो. “ती वीटभट्टी बघा.” प्रतिभाने दूरवरची भट्टी दाखवली. “इथल्या लोकांना विटा आणण्यापेक्षा इथेच बनवणं सोयीचं वाटतं.” विटा व्यवस्थित रचल्या होत्या, बाजूलाच लाकडं गोळा करून ठेवली होती. भट्टी लावायची तयारी झाली होती. “इथले गांवकरी एकच पीक घेत होते. नाचणी किंवा वरीचं. आता पाणी मिळतंय बंधाऱ्याचं. ते दोन तीन पिकं घेतात.” माधुरी सांगत होती. “पूर्वी पावसाळ्यानंतर, म्हणजे पीक तयार झाल्यावर, दसऱ्याच्या सुमारास इथले शेतकरी कामाच्या शोधात इतर जागी जात. स्थलांतरित कामगार! पडेल ती कामं शहरात वा इतर ठिकाणी करायचे. आता स्थलांतर बंद! पाण्याच्या उपलब्धतेने किती चमत्कार घडवलाय. तीन पिकं घेणारे शहरात काम शोधायला कशाला जातील?” आम्ही खैरमाळमध्ये दाखल झालो. पहिल्या घरापाशी मुले खेळत होती. फोटो काढतो म्हणालो तर त्यांची आई हसून काही बोलली. त्यांची वारली भाषा. मला काहीच कळलं नाही, माधुरीने खुलासा केला. ‘मुलं तयार होऊन, चांगले कपडे घालून येतील.’ खैरमाळमध्ये दहा-आकारच घरं असली तरी ती मोठी आहेत. एका घराजवळ आरोहनने पाण्याची टाकी बांधली आहे. खालीच तीन नळ बसवून मोरी केली आहे. दोन मुलं हात-पाय धूत होती. “ती बघा फोटोसाठी तयार होत आहेत.” माधुरी म्हणाली.   एका घरासमोर मोठं आंगण होतं, तिथे आम्ही जमलो. घराच्या तुळईवर ‘ग्रामसभा-खैरमाळ’ अशी पाटी होती. आरोहनने शासनाची आंगणवाडी योजना इथे आणली. ‘अमृताहार’ ग्रामस्थ स्त्रियांना मिळवून दिला. बाई गरोदर असली तर तिला तिसऱ्या महिन्यापासून अमृताहार देण्यात येतो. कुपोषणाची समस्या त्यामुळे दूर होते. गांवातली बायका-मुलं आमच्या अवतीभवती गोळा झाली. मी त्यांना बंधाऱ्यामुळे काय फायदे झाले ते विचारले. त्या सगळ्याजणी भरभरून बोलल्या, काबाडकष्टाचे जीवन मागे पडले होतं. मी ते व्हिडीओवर टिपलं.

 

माझं लक्ष घराच्या प्रवेशद्वाराकडे गेलं. व्हरांड्यासारख्या जागेत चक्क इंग्रजी तक्ते होते. “इथला एक मुलगा डीएड झालाय. तोच शिकवतो.” प्रतिभा म्हणाली. आत्ता कुठे वीज आलीय, पाणी मिळालंय, बायकांना दोन-चार किलोमीटर पाण्याचे हंडे घेऊन टेकडी चढाउतरायला लागत नाहीये, आंगणवाडी आली, गावात सुईण पोहोचू शकते, अमृताहार मिळतोय, कुपोषणाकडे ग्रामसभा लक्ष देतेय, आयुष्यात सुविधा आणि व्यवस्थितपणा आलाय. हे सर्व व्हायला स्वातंत्र्यानंतर सत्तराहून अधिक वर्षे लागली. त्याबद्दल सरकारी यंत्रणेला दोष द्यायचा, त्यांच्यावर ठपका ठेवायचा, की आरोहनसारख्या एन्जिओकडे आशेने बघायचं? तुम्हीच ठरवा.

विवेक पटवर्धन

InfoBank

The Infobank will serve as an unparalleled and comprehensive information hub. From sustainable development initiatives to effective governance models, the Infobank aims to empower tribal societies with the information they need to thrive. It aspires to bridge the gap between policymakers, community leaders, and the tribal population, fostering collaboration and facilitating informed decision-making.

Introducing our AROEHAN INFOBANK.

This will close in 25 seconds