आमचा गाव, आमचा विकास – ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण
दिनांक १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती डहाणू आणि आरोहन संस्था यांच्या समन्वयाने “आमचा गाव आमचा विकास” या विषयावर ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पेसा ग्रामकोष समिती, ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा के.एल.पोंदा हायस्कूल, डहाणू येथे आयोजित करण्यात आली.सदर प्रशिक्षणासाठी रिसोर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर येथून दत्ता गुरव यांना आमंत्रित करण्यात आले होते. ह्या प्रशिक्षणासाठी डहाणू तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पेसा ग्रामकोष समिती सदस्य आणि ग्राम विकास अधिकारी असे एकूण १२८ लोकांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणासाठी पंचायत समिती डहाणूच्या गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रशांत जाधव, सभापती प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संदीप जाधव व संतोष बेलखडे आणि पेसा समन्वयक पंकज धांगडा आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी दत्ता गुरव सरांनी ग्रामपंचायत पातळीवरील व्यवस्था, कार्य, निधी, यंत्रणा याबाबत माहिती दिली. त्यानंतर गाव गरजांचा शोध कसा पहावा, गाव विकासासाठी कोणता निधी उपलब्ध होतो, गाव विकास योजना निधी, या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यशाळेची सुरुवात आदल्या दिवसाची उजळणी उपस्थित असलेल्या सहभागी यांनी केली. दुसऱ्या दिवशी, गाव विकासाचे विविध आराखडे समजून घेण्यासाठी सहभागी यांचे गट तयार करून त्यांना ग्राम पंचायत विकास आराखडा, समृध्दी आराखडा, स्वच्छ्ता आराखडा, आरोग्य आराखडा, पेसा गाव आरखडा, महिला व बाल कल्याण व ग्रामनिधी आरखडा तयार करायला सांगितले तसेच आपण त्या त्या आराखड्यात कोणती विकास कामे घेतली, निधी कसा वापरला या बद्दल प्रत्येक गटाने सादरीकरण केले.आरखडे सादर केल्या नंतर ह्यावर इतर योजनांचा समन्वय कसा घडवून आणू शकतो याबाबत सोप्या पद्धतीने दत्ता सरांनी समजावून सांगितले.
प्रशिक्षणाच्या शेवटी उपस्थित राहिलेल्या सहभागी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काही सहभागी यांनी आराखडा तयार करण्याची पद्धत खूप सोप्या पद्धतीने समजली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला असे म्हणाले, आरखडा तयार करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या, काहींनी सीएसआर फंड चे नियोजन व त्यांचे अनुभव सांगितले. घोलवड हे महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव म्हणून घोषित केले गेेले त्याबद्दल घोलवड चे सरपंच यांनी आपले अनुभव सांगितले आणि आपण ही नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करून आपल्या गावाचा विकास करू शकतो असे इतरांना आवाहन केले. उपस्थितांनी आजचे मुख्य प्रशिक्षक, आरोहन आणि पंचायत समितीचे आभार व्यक्त केले.